भाग १ भाग २ भाग ३
भाग ४ भाग ५

राजाराम निळकंठ बढे अर्थातच .... कविवर्य राजा बढे ..... नावाप्रमाणं खरोखरच राजा माणूस, राजस व्यक्तीमत्वाचे धनी. सामान्यांना कवि राजा बढे म्हणून सुपरिचीत. नागपूरच्या महाल भागात १ फेब्रुवारी १९१२ ला त्यांचा जन्म झाला. त्यानंतर काही काळ त्यांनी मध्यप्रदेशातील छिंदवाडयात घालवला. वडील निळकंठ बढे आणि आई गोदावरी यांची त्यांच्यावर फार माया ... पण लवकरच मातृ छत्र हरपलं .... आणि व्यथित झालेल्या राजा भाऊंनी कवितांमध्ये स्वतःला गुंतवून घेतलं. उंच शरीरयष्टी, भव्य कपाळ, केवडयासारखी अंगकांती, सरळ नाक, पाणीदार डोळे, सारचं कसं प्रेक्षणीय. राहणीमान अत्यंत साधं. चेहऱ्यावर मृदू मुलायम हास्य अशी त्यांच्या व्यक्तीमत्वाची काही वैशिष्ट्ये होती. प्रतिभासंपन्न कवि, लेखक, उत्कृष्ठ नाटककार, संगीतकार, अभिनेते, चित्रपट निर्माते, उत्कृष्ठ नेलपेंटर, नखचित्रकार, खरडचित्रकार, चित्रकार आदी गुणांनी परिपूर्ण होते. अनुप्रास हा त्यांचा आवडता अलंकार. संस्कृत, बिहारी, पंजाबी, बेंगाॅली, उर्दु, इंग्रजी, गुजराती, हिंदी, आदी भाषांमधील काव्याचे मराठी अनुवाद लेखनही त्यांनी विस्तृत केलं. पण उल्लेखनिय बाब म्हणजे त्याकाळी रेडीयोवर प्रसिद्ध ठरलेल्या ‘‘श्रृतिका’’ आणि ‘संगितीका’ या प्रकाराचे जनक देखील राजा बढेच आहेत.

नागपूरातील नवोदित आणि उदयोन्मुख कवींबरोबर कार्य करतांना रविकिरण मंडळाची आणि साहित्य संपादक मंडळाची नागपूरला स्थापना केली. शैक्षीणिक काळात काॅलेजमधल्या युवा लेखकांसाठी शारदा मंडळाची स्थापना केली. पण आपलं पदवीचं शिक्षण पूर्ण करू शकले नाही. मग त्यांनी महाराष्ट्र, वागिश्वरी, सकाळ आदी नियतकालिकांतून सहसंपादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. याच काळात त्यांनी कोंडबा, दुर्गादास, लहर, तिरंदाजी, गुंडयाभाऊ यासारख्या टोपण नावांनी सामाजिक विषयांवर कोटी करणारे लेखनही केले. रामराज्य - या चित्रपटाची सर्वच गाणी लोकप्रीय झाल्यानंतर तत्कालीन सर्व ख्यातनाम आणि नावाजलेल्या गायकांनी त्यांची गाणी गायली अनेक संगीतकारांना प्रोत्साहन देत राजाभाऊंनी त्यांना आपल्या कविता चाली लावण्यासाठी दिल्या. विडंबन या प्रकाराची त्यांनी लोकांना नव्यानं ओळख करून दिली. कथाकथन या आज लोकप्रीय झालेल्या प्रकाराची मुळ संकल्पना राजाभाऊंचीच. त्यांनी एकुण १४ चित्रपटांकरीता गीतं लिहिली. पण धाकटे बंधू बबनच्या सहकार्यानं स्वानंद चित्र ही संस्था उभारून ‘‘रायगडाचा राजबंदी’’ या चित्रपटाची निर्मिती केली. त्रैमासिक ‘‘महाराष्ट्र - साहित्य पत्रिका’’, ‘‘अभिरूची’’, ‘‘नांदी’’ या पाक्षिकांचीही निर्मिती केली.

आज सर्वांना आवडणाऱ्या इव्हेंट प्रकाराचेही जनक कवि राजा बढेच .... कविवर्य राजा बढे यांच्या नावे एकंदर १८ काव्यसंग्रह, ४ नाटके, ९ संगितीका, ५ एकांकिका, १ कादंबरी, विविध प्रसिद्ध साहित्यांचं अनेक भाषांच मराठी भावानुवाद, अनेक रसानुवाद आदी साहित्य आहे. सोबतच अनेक ऐतिहासिक प्रसंगांवरचं लेखन, लहान मुलांसाठीचं लेखन, एक लघु कादंबरी, याशिवाय विस्तृत स्पुटलेखन, लेख, टिपणं, आदी बरच साहित्य प्रसिद्ध झालं पण जितक प्रसिद्ध झालं त्याच्या किती तरी पटीनं साहित्य दुर्दैवानं अप्रकाशित राहिलं. इतकं भरभरून कार्य करणारा महाराष्ट्राचा उमदा कवी आजही उपेक्षितच आहे ही अत्यंत खेदजनक गोष्ट म्हणावी लागेल. कुठल्याशा कामानं ते दिल्लीला गेले आणि ७ एप्रिल १९७७ त्यांची तिथंच प्राणज्योत माळ्वली. नागपूरच्या या कलावंताला आमचा मानाचा मुजरा ....

आठवणीतले राजाभाऊ

Press Esc to close
© 2014 Raja Badhe, All right reserved